अक्षय्यतृतीयेचे महत्व

अक्षय्यतृतीयेचे महत्व

 अक्षय्यतृतीया हा साडेतीन  मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त मानला जातो. याच दिवशी सत्य म्हणजेच कृतयुग आणि त्रेतायुग या दोन्ही युगांचा आरंभ झाला म्हणून याला युगादी असेही म्हणतात. श्रीविष्णूंच्या २४ अवतारांपैकी परशुराम हा अवतार पृथ्वीतलावर अक्षय्यतृतीयेच्या दिवशी प्रकट झाले. याच दिवशी श्रीवेदव्यासांनी महाभारत लेखनास प्रारंभ केला. याच दिवशी पवित्र अशी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली‌. अक्षय्यतृतीयेचा हा दिवस पितृपूजनासाठीही प्रसिद्ध आहे. याच दिवशी सुदाम्याने श्रीकृष्णाला मूठभर पोह्याची पुरचुंडी दिली आणि मित्रप्रेम - मित्रधर्माला अनुसरून श्रीकृष्णांनीसुद्धा सुदाम्याला त्याच्या नकळत अपार धनसंपत्ती प्रदान केली. अक्षय्यतृतीयेलाच अन्नपूर्णेचा जन्म झाला आहे. एका अक्षय्यतृतीयेला श्रीकृष्णाने युधिष्ठिराला अक्षयपात्र दिले होते, तर एका अक्षय्यतृतीयेलाच श्रीकृष्णाने चीरहरणप्रसंगी द्रौपदीला अक्षयवस्त्र पुरवले होते. श्रीबद्रीनारायण मंदिराचे दरवाजे अक्षय्यतृतीयेच्या दिवशीच उघडले जातात. अक्षय्यतृतीया ही अक्षय सुखाची कारक आहे. या दिवशी केलेल्या जप, तप, दान पुण्याचा क्षय होत नाही‌. यादिवशी पंचांगशुद्धी, दिनशुद्धी पाहण्याची आवश्यकता नाही.

*सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा पुण्यप्रद दिवस श्रीविष्णूपूजनाचा, श्रीविष्णू नामस्मरणाचा आणि श्रीविष्णू कृपेचा दिवस आहे. या दिवशी विष्णुसहस्रनामाची अखंड आवर्तने करावीत.*

अक्षय्यतृतीयेला पूर्वजांचे स्मरण, व त्यानिमित्त तर्पण, हवन, दान करावे असे म्हटले आहे. *प.पू. श्रीवासुदेवानंद टेंब्ये स्वामींनी सांगून ठेवले आहे - विष्णुसहस्रनाम पठणाने आपल्या पूर्वजांना सद्गती मिळते आणि यासाठी अक्षय्यतृतीयेइतका योग्य दिवस अन्य कोणताही नाही.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Blog Archive

Total Pageviews