बहुतेक आवर्ती पडिले । प्राणी वाहातचि गेले । जेंहिं भगवंतासी बोभाइलें । भावार्थबळें ।।
।। दास-वाणी ।।
बहुतेक आवर्ती पडिले ।
प्राणी वाहातचि गेले ।
जेंहिं भगवंतासी बोभाइलें ।
भावार्थबळें ।।
देव आपण घालूनि उडी ।
तयांसी नेलें पैलथडी ।
येर तें अभाविकें बापुडीं ।
वाहातचि गेली ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०३/१०/०८-०९
मायानदीचे रूपक आहे हे.
प्रपंच हा तिचा ऐलतीर, तर परमार्थ पैलतीर.
प्रपंचामधे आशा ममतेची बेडी सुटत नाही.
अहंकार आणि कामरूपी मगराने जीवाला मिठी मारलीये.
मी कर्ता, मी भोक्ता, माझ्या कुळाचा अभिमान
यामुळे मायानदीच्या भोवऱ्यामधे बद्ध जीव
अडकतो, गरागरा फिरत राहातो.
जोरदार प्रवाहामधे फरपटत वाहूनही जातो.
जे थोडेफार मुमुक्षू जीव असतात.
त्याना केलेल्या चुकांची जाणीव असते.
भोग भोगूनही अतृप्ततेची भावना असते.
ते मात्र भगवंताला मनापासून आर्ततेने साद घालतात.
भगवंत भावाचा भुकेला असल्याने स्वत: मायानदीमधे
उडी घालतो आणि आपल्या निस्सीम भक्ताला
पैलतीरी पोहोचवून परमार्थ म्हणजे मोक्षाची वाट
खुली करून देतो.
इतर सर्व अश्रद्ध बापुडे जीव मात्र मायेच्या
प्रवाहात वाहून जातात. प्रपंचामधेच रमतात.
वासनेच्या पोटी पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या
फेऱ्यामधे अडकून पडतात.
मुक्ती हवी असेल तर विरक्ती हवीच !
वैराग्यनिरूपण समास.
No comments:
Post a Comment