Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

येक वोसणतचि उठिले । येक अंधारी फिरो लागले । येक जाऊन निजेले । उकिरडयावरी ।।

।। दास-वाणी ।। 

येक वोसणतचि उठिले । 
येक अंधारी फिरो लागले । 
येक जाऊन निजेले । 
उकिरडयावरी ।। 

येक मडकीं उतरिती । 
येक भोई चाचपती । 
येक उठोन वाटा लागती । 
भलतीकडे ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १८/०९/११-१२ 

कीर्तन ऐकता ऐकता झोपी गेलेल्या भक्तमंडळींची
कीर्तन संपून लोक घरोघरी गेल्यानंतरची स्थिती आहे ही.
उत्तररात्री कोणी झोपेमधेच बडबड उठतात.
कोणी झोपेतच अंधारात तडातडा चालू लागतात.
काहीजण मंदिरातून उठून उकिरडयावरच 
जाऊन पुन्हा गाढ झोपी जातात.

कोणी मिटल्या डोळयांनीच उतरंडीवरील 
मडकी उतरवण्याच्या हावभावात असतात.
एखादा नुसताच जमीन चाचपडत राहातो,
तर कोणी झोपेतच स्वत:च्या घराची दिशा सोडून 
भलतीकडे तराचरा चालू लागतो.

जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या या चार पैकी 
सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा या अवस्थेमधे
माणूस अशा विचित्र नकळत गोष्टी करतो.

वर्णन जरी भौतिक निद्रेचे असले तरी 
इथे अज्ञान निद्रा रूपकाद्वारे स्पष्ट केली आहे.
जागा असलेला माणूस देखील विचारांनी 
भरकटला की कृतीमधेही कळून सवरून बहकतो.
हाच समर्थांचा संदेश आहे.

निद्रानिरूपण समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp