Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)
📞 💬

नेत्री काहीं बाहोलि नसे । जेव्हां जे पाहावें तेव्हां तें भासे । डोळां प्रतिबिंब दिसे । तें साच कैसेनी ।।

।। दास-वाणी ।। 

नेत्री काहीं बाहोलि नसे । 
जेव्हां जे पाहावें तेव्हां तें भासे । 
डोळां प्रतिबिंब दिसे । 
तें साच कैसेनी ।। 

लघुदर्पणें दोनि च्यारी हातीं । 
तितुकीं मुखें प्रतिबिंबती । 
परी तें मिथ्या आदिअंतीं । 
एकचि मुख ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०६/०८/१६-१८ 

दृश्य मिथ्या आहे म्हणतात तरी ते का दिसते ?
जे दिसते ते सर्व खरे मानावे हे ज्ञात्याचे लक्षण नाही.
डोळयातली बाहुली स्वत:ला दिसत नाही.
पण त्याच डोळयाने जे जे पाहावे ते ते सर्व
आपल्याला स्वच्छ स्पष्ट दिसते.
नेत्र पटलावर जे प्रतिबिंब आपण पाहातो 
ते खरे असते थोडेच ?

दोन चार आरसे एकाच वेळी हातात घ्या आणि पाहा.
आरशांच्या संख्येइतकीच आणि आकारानुसार
लहान मोठी प्रतिबिंबे दिसतात.
आरशामधे पाहाण्याच्या आधी आणि नंतर 
ते चेहेरे नसतात.
मुख हे एकच असते. बाकी प्रतिरूपे प्रतिबिंबे
ही मिथ्याच ठरतात.
मिथ्या म्हणजे जे खरे नाही परंतु खरे भासते ते ! 
त्याचप्रमाणे दृश्य मायिक सृष्टीही मिथ्याच !
एकमेव सत्य ते फक्त परब्रह्म.

दृश्यनिर्शन समास.