Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)
📞 💬

जंव नाहीं ज्ञानप्राप्ती । तव चुकेना यातायाती । गुरूकृपेविण अधोगती । गर्भवास चुकेना ।।

।। दास-वाणी ।। 

जंव नाहीं ज्ञानप्राप्ती । 
तव चुकेना यातायाती । 
गुरूकृपेविण अधोगती । 
गर्भवास चुकेना ।। 

ध्यान धारणा मुद्रा आसन । 
भक्ती भाव आणी भजन । 
सकळही फोल, ब्रह्मज्ञान । 
जव तें प्राप्त नाहीं ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०५/०१/३५-३६ 

अहं ब्रह्मासि । मी परब्रह्मस्वरूप आहे.
सर्वं खलु इदं ब्रह्म । सर्व विश्वही ब्रह्मच आहे.
तत्वमसि । ते ब्रह्म साक्षात तूच आहेस.
या सर्व गोष्टींची अनुभूती म्हणजे ज्ञान होय.
नि:संशय ज्ञानप्राप्तीशिवाय 
पुनरपि जननं पुनरपि मरणं । म्हणजेच 
जन्म आणि मृत्यूचा फेरा अर्थात यातायाती चुकत नाही.
सद् गुरूकृपेशिवाय उर्ध्वगति म्हणजे मोक्षप्राप्ती नाही.
म्हणजेच गर्भवासाची अधोगती सुरूच राहाते.

अष्टांगयोगामधील आसन ध्यान धारणा मुद्रा अगदी
कितीही उच्च कोटीच्या तुम्ही करा.
भक्तीभावाने अखंड भजनातही गर्क रहा.
परंतु ही फक्त भगवंताकडे नेणारी साधने आहेत.
यांच्या सहाय्याने जर तुम्ही ब्रह्मज्ञान प्राप्त
करू शकला नाहीत तर या सर्व आयुष्यभर केलेल्या 
साधना फोल गेल्या आहेत हे नक्की .

गुरूनिश्चय समास.