Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

उच्चारेंविण जे शब्द । ते जाणावे सहजशब्द । प्रत्यया येती परंतु नाद । कांहींच नाहीं ।।

।। दास-वाणी ।। 

उच्चारेंविण जे शब्द । 
ते जाणावे सहजशब्द । 
प्रत्यया येती परंतु नाद । 
कांहींच नाहीं ।। 

ते शब्द सांडून बैसला । 
तो मौनी म्हणावा भला । 
योगाभ्यासाचा गल्बला । 
याकारणें ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १७/०५/०८-०९ 

एकांतामधे शांत मौन धरून श्वासांवर लक्ष 
केंद्रित केले तर श्वास घेताना ' सो ' आणि
 सोडताना ' हं ' असे शब्द ऐकू येतात. 
खरे तर प्रत्यक्ष तोंडातून हे शब्द आपण उच्चारत नाही.
तरीही ते श्वासांमधून उमटतात म्हणून त्यांना
सहजशब्द म्हटले जाते.
सो हं हे शब्द हे श्वासांबरोबर जाणवतात,
परंतु त्यांचा नाद म्हणजे ध्वनी उमटत नाही.
हाच तो श्वासांवर सुरू असलेला अजपाजप.

हा जाणवणारा सो हं ध्वनी सुद्धा सोडून देऊन 
जो ध्यानामधे गर्क राहातो तो खरा मौनी म्हणावा.
कायिक वाचिक आणि मानसिक अशा तीनही
मौनाच्या अवस्था जो अखंड पाळतो,
त्याचेच मौन खरे मानावे.
यम, नियम, आसन, प्राणायाम, 
प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी
या सर्व योगाभ्यासाच्या पायऱ्या 
मौनातूनच सुरू होतात. मौनामधेच पूर्ण होतात.
अखंड सहज चालणारा हा ही अजपाजप.

अजपानिरूपण समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp