Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

नाना गुणास आहे नाश । निर्गुण ते अविनाश । ढोबळयाहून विशेष । सूक्ष्म देखणे ।।

।। दास-वाणी ।। 

नाना गुणास आहे नाश । 
निर्गुण ते अविनाश । 
ढोबळयाहून विशेष । 
सूक्ष्म देखणे ।। 

जे जे दृष्टीस न पडे ठावे । 
तें ऐकोन जाणावें । 
श्रवणमननें पडे ठावें । 
सकळ कांहीं ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १७/१०/१२-१३ 

ज्याला रंग रूप आकार आणि नाम आहे,
ते सर्व सगुणामधे मोडते.
जे जे सगुण आहे त्याला कधी न कधी नाश आहेच.
उपजे ते नाशे । 
निर्गुण परब्रह्म मात्र अविनाशी आहे.
ढोबळ म्हणजे स्थूल. स्थूल म्हणजे सगुण.
सूक्ष्म म्हणजे निर्गुण.
स्थूल सगुणाला सगळेच पाहू शकतात.
ते दिसत असल्याने जाणतातही.
सूक्ष्म निर्गुण दिसत नाही म्हणून कळत नाही.
निर्गुणाला पाहाणे हे खरे देखणे म्हणावे.
ते फक्त ज्ञानी पुरूषालाच शक्य आहे.

जे चर्मचक्षूंना दिसत नाही त्या निर्गुणाविषयी 
ज्ञानी पुरूषाकडून ऐकून समजावून घ्यावे.
दीर्घकाळ सतत श्रवण मनन चिंतन निदिध्यासन 
या टप्प्यांमधून साधकाचा निर्गुणाकडे प्रवास 
सुरू राहातो.
अधिकारपरत्वे पूर्वसुकृतानुसार फारच थोडे लोक
आत्मपदी आरूढ होतात. तेच सिद्ध होत.

टोणपसिद्धलक्षण समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp